Ad will apear here
Next
आठवणींची तंद्री आणि वर्तमानाचं चक्र


रात्रीत कधीतरी हात पांघरुणाबाहेर आलेला असतो. पहाटे या कुशीवरून त्या कुशीवर वळताना तो थंड पडलेला हात अलगद परत उबदार पांघरुणात जाऊन पांघरूण पार कानापर्यंत घेऊन परत झोपायचं. जरा डोळा लागणार तोच वैद्य अंधारात करत असलेल्या चहाचा दरवळ माझ्या नाकापर्यंत येतो. ‘चहा तयार होतोय’ची सूचना मेंदूनं दिलेली असल्यानं झोपलेली, पेंगुळलेली गात्रं हळूहळू जागी व्हायला लागतात. माझ्या उशाशी रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशाची एक तिरीप येते. मला किती वाजलेत हे बघायला या तिरीपेचा उपयोग होतो. म्हणजे मोबाइलचा उजेड असतो; पण झोपेत तो पुरा पडत नाही. जागं झाल्याची चाहूल वैद्यांना बरोब्बर कळते आणि ‘चहा हवाय का’ असं वस्सकन, पण किंचित प्रेमानं विचारलं जातं. मला याचीच सवय आहे. खूप प्रेमानं बिमानं विचारलं तर मला काय विचारलं तेच कळणार नाही. तर ते असो.

मी ‘बेड टी’ला हो म्हणते. पहिल्या वाफेचा, ताज्या दुधाचा आयता चहा मला आवडतोच. असा दिवस सुरू होतो. लांबून वॉव..वॉव...वॉव असा आवाज करत वेगानं जवळ येणाऱ्या अॅब्युलन्सचा आवाज जवळ येऊन परत लांब जातो. हायवे जवळ असल्यानं दिवसातून किमान साताठ वेळा तरी हा आवाज ऐकायला येतोच. ‘चांगलं होऊ दे रे बाबा,’ असं मनातल्या मनात त्याला सांगितलं जातं. आता मात्र कामाला वेग यायलाच हवा असतोय. नऊ वाजता, घराला मिरची कोथिंबिरीसारखा आधार असणाऱ्या आपल्या कर्मभूमीला हजर राहायला हवं.

काल टबात घासून ठेवलेली भांडी जागेवर लावायला कंटाळा केलेला असतो. त्यांना आपापल्या जागी बसवून एकीकडे कढईत आदल्या रात्री हळद, मिठाच्या पाण्यात टाकलेले फ्लॉवर आणि बटाट्याचे तुकडे टाकले जातात. एका वाफेनंतर बारीक चिरलेली मेथी, जी दोन चार चमचेच असते ती वाटीतून चार-पाच दिवस फ्रीजमध्ये इकडून तिकडे होत असते, तिलाही भाजीत टाकलं जातं. एकीकडे कणीक भिजवणं सुरू असतं. वैद्य आता मोबाइलवर तांदूळ निवडत, ‘काही करायचं असेल तर सांग गं,’ असं म्हणत परत मोबाइलच्या अधीन होतात. 

भिजवलेल्या कणकेवर पोळपाट उपडा टाकून आता कढीच्या तयारीला लागायचं. एकीकडे मिक्सरच्या भांड्यात दोन लसणीच्या पाकळ्या, आल्याचा दोन पेरभर तुकडा, हिरवी मिरची, ओला नारळ, दालचिनीचा एक पेर तुकडा, साताठ मिरे, एक छोटा कांदा, मीठ, साखर आणि एक चमचा डाळीचं पीठ घालून अगदी बारीक गंधासारखं वाटून ताकाला लावायचं. आणि ताकाला उकळी आली, की लोखंडी पळीत तूप-जिऱ्याची हिंग, हळद घालून फोडणी करायची. आणि ती पळी ताकात बुडवून पटकन कढीवर झाकण ठेवायचं. एव्हाना भाजी होते. या भाजीत फक्त धने-जिरं पावडर, साखरेची चिमूट आणि कोथिंबीर घालायची. सात्त्विक भाजी तयार. दुपारी डब्यात ही भाजी आणि पोळी घेऊन जायचं. डबा खाल्ला तरी हलकं वाटतं. पोळी भाजी संपली, की भाजीच्या डब्यात खाली राहिलेली कोथिंबीर, मोहरीचे दाणे तर्जनीने चेपून खाऊन टाकायचं. मला आवडतं ते. असो.

साडेआठला, चहा ढवळण्यासाठी घेतलेले आणि नंतर ठ्ठाक्कन सिंकमध्ये टाकलेले चमचे घासून ओट्यावर ठेवायचे. चमचे वेळीच न धुतल्यानं संध्याकाळी काटा चमच्याने साखर ढवळायची वेळ येते. चांगले डझनभर चमचे आणायची ऑर्डर निघते. मला त्या वेळी उगाचच आईनं अडीच रुपये वेगळे साठवून त्या काळी अडीच रुपयांचे बारा चमचे घेतल्याची आठवण सांगितलेली आठवते. आता स्वयंपाकघराला राम राम म्हणत आटपून कामावर हजर.

रोज नवा अनुभव असतो इथं. त्या दिवशी उच्च पदावर असणाऱ्या एका डॉक्टरला, स्टाफनं पुस्तक परत करण्याविषयी फोन केला. लेट फी देणार नाही, वर्गणी देणार नाही आणि माझं पुस्तक हरवलंय. असा पाढा वाचला. वास्तविक अजूनही आम्ही कोणावरही फी किंवा लेट फीविषयी जबरदस्ती करत नाही. ते आमच्याकडून सांगितलंही गेलं; पण ते काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हतेच. उलट कोर्टात जाण्याची भाषा बोलायला लागले. या कोरोनामुळे लोकांवर काय काय परिणाम होणारेत कोण जाणे. शेवटी त्यांच्याकडून हरवलेल्या पुस्तकाची रक्कम डिपॉझिटच्या रकमेतून वजा करून उरलेले पैसे त्यांनी पाठवलेल्या माणसाबरोबर पाठवून दिले. सोबत आम्ही त्यांची किती वर्गणी आणि लेट फी माफ केली याचे आकडे पाठवले. थोड्यावेळानं कॅश काउंटरवर असणाऱ्या मुलीनं आपल्याला पाच हजाराची देणगी मिळाल्याचं सांगितलं. तासभरापूर्वी जे त्या डॉक्टरकडून येणं आम्ही माफ केलं त्याच्या किती तरी पटीनं आम्हाला मिळालं. वाचायला वेळ मिळाला नाही, तरी पुस्तकांच्या सान्निध्यात राहून हे समाधान आम्हाला मिळतंय हे काय कमी आहे का... आता हळूहळू येईल सगळं जागेवर.

खालचे शेजारी लांब कुठे तरी राहायला गेलेत. त्यांनी लावलेली केळीची झाडं आणि इतर झाडं गुमसुम झालीत असं वाटलं. एका केळीची लांब लांब पानं माझ्या खिडकीपर्यंत आली आहेत. लहान मूल हात पसरून आपल्या आवडीच्या माणसाकडे कसं जातं ना हात पसरून, तसं केळीची पानं बघताना वाटतंय. केळफुलाची एकेक पाकळी दर दोन दिवसांनी गळून पडतीये. मला ते काढणं शक्य नाही. बघू... समोरचे अनेक महिन्यांनी आपल्या घरी परत आलेत. तोपर्यंत त्यांच्या झाडांना पाणी घालण्याचं काम वैद्य भक्तिभावानं करत होते. मागे त्यांच्या घरी लावलेल्या सदाफुलीच्या माडयानं आता अंग धरलंय.

बघता बघता वर्ष संपत आलं. या वर्षाच्या आठवणी, अनुभव अगदी लिहून ठेवाव्या अशाच. एरव्हीही उधळमाधळ न करता आपण जगतो; पण आता आपल्या पुढच्या पिढीला या विषाणूच्या काळातील अनुभव किस्से लिहून ठेवावे असं वाटतंय. अजून पन्नास वर्षांनी ते जर कुणी वाचले, तर ते कसे रिअॅक्ट होतील काय माहीत. माझ्या पणजीनं प्लेगच्या काळातल्या तिच्या आठवणी सांगितल्या होत्या, तेव्हा ती म्हणाली होती, की जुजबी सामान घेऊन आपलं घर सोडून आम्ही शेतावर, मोकळ्या जागेत राहायला गेलो होतो. पणजोबा घरी ये-जा करत. आम्ही म्हटलं.. ‘अरे काय मजा येत असेल ना मोकळ्यावर खेळायला.’ लहान वय ते. आम्ही खेळण्यापुरताच विचार केला होता. इथे आपण निदान आपल्या घरी सुरक्षित तरी आहेत. 

पणजीची एक मुलगी दुसरीकडे राहायला गेली होती. तिची काहीच खबरबात नव्हती. काही दिवसांनी घरी परतल्यावर घरच्या पेटीत तिचे डूल दिसले. पणजी आजी समजून गेली काय ते. आज इतक्या वर्षांनी त्या मी न पाहिलेल्या मावशी आजीची आठवण झाली. आपले ऋणानुबंध असतात ते हे असे. अधेमधे या आठवणींनी तंद्री लागते. ‘चहा हवाय का,’ हा प्रश्न तंद्री भंग करते. आणि पुन्हा संध्याकाळचं चक्र सुरू होतं. आदल्या दिवशी पुसलेली मायक्रोवेव्हवरची धूळ पुन्हा जमा झालेली असते. त्यावर बोट फिरवून मी माझंच नाव लिहिते आणि मग फडक्यानं पुसूनही टाकते. जरा मजा.

सध्या घरात असलेल्या कापडाचे ५ x ५ चे तुकडे करून ते जोडून गोधडी करायचं काम कासवाच्या गतीनं सुरू आहे. असो.

बघता बघता ८८१+++ शब्द झाले. आता थांबतेच.

बास बाकी काही नाही.

- मंजिरी जोशी-वैद्य

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GVFICU
Similar Posts
पोळी-भाजी करणारे मोडक आजोबा लग्नानंतर सासूबाई गावाला जायला निघाल्या तेव्हा त्यांनी सासऱ्यांना म्हटलं, ‘आता बरंय. मंजिरी आलीये घरात. ती करतीये सगळं. मग मोडकांना बोलवायची गरज नाही. हे हवं तर भाजी करतील. चालेल ना हो?’ मी, ‘हे मोडक कोण’ म्हणून विचारल्यावर सासरे म्हणाले, ‘तुझ्या सासूचा मित्रय हो तो. आमच्याकडे अडीअडचणीला मदतीला येतो
... तर मी ‘डिसेंबर’ झाले असते! मला कायम वाटतं, की मला कोणी एखादा महिना होण्याची संधी दिली असती, तर मी डिसेंबर झाले असते... मस्त गुलाबी थंडीचा, धुक्याच्या दुलईचा... शाळेतल्या स्नेहसंमेलनांचा, प्रेमाला बहर यायला अगदी आदर्श असलेला... सांताक्लॉजच्या ख्रिसमसचा, लग्न समारंभांचा, फिरण्याचा... भटकण्याचा... नाटक, गाणी, नृत्याच्या कार्यक्रमांची
वृत्तीची निवृत्ती निदान समोरच्याला ऐकण्याची क्षमता आपल्यात शिल्लक असली पाहिजे. आपल्यात कोणालाच तसा रस राहिलेला नसतो. आपली उपयोगिता सर्व अर्थाने संपलेली असते. हे मान्य करून खऱ्या अर्थाने निवृत्त व्हायचे असेल तर वृत्तींची निवृत्ती कशी होईल या एकाच गोष्टीत त्याची सगळी उत्तरे सापडतील. ज्ञानेश्वर माऊली हेच सांगून गेली. आपल्या
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language